क्षेत्र म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. हे शहर पवित्र माणगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. म्हसवड हे सातारा-पंढरपूर रस्त्यावर पंढरपूरपासून ६० किमी अंतरावर एक गाव आहे. येथे श्री.सिद्धनाथांचे सुमारे इ. स. १0 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे.
या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. मंदिर अखंड पाषाणात बांधले बांधले आहे. दगड आणि चुना वापरून नक्षीदार दगडी खांब, सभामंडप बांधण्यात आले आहे. मंदिर शिखराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि सुबक असून मंदिराच्या शिखरावर शिव, दत्तात्रय, गणेश यांच्यासोबतच अनेक देवांच्या मूर्ती कोरीव मूर्ती कोरलेल्या आहेत.
गाभाऱ्याच्या खाली प्राचीन भुयार आहे. या भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड आहे. श्री.सिद्धनाथ हे प्रत्यक्ष शिवाचा अवतार असून श्री.माता जोगेश्वरी ही त्यांची पत्नी आहे. श्रींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक व देखण्या आहेत. भुयार वर्षातून एकदाच महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. भुयारमध्ये एका वेळी एक व्यक्ती प्रवेश करू शकते. आत ७ ते ८ भाविक बसू शकतील एवढीच जागा आहे.
या भुयाराच्या वरील गाभाऱ्यात श्री.सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे प्रसन्न व नयन मनोहर आहेत.
गाभाऱ्याच्या बाहेर श्रींच्या पादुका आहेत. इथेच महादेव, नवनारायण, गणपती, दुर्गामाता, श्रीकृष्ण, दत्तात्रेय, अंबाबाई, काळूबाई, संतोषी माता, विठ्ठल-रुक्मिणी, घोडा इ. देवांच्या मूर्ती आहेत. तसेच मोडी लिपीतील प्राचीन शिलालेख कोरलेला आहे.
बाहेर सभामंडप आहे. सभामंडपात हत्तीची सुबक मूर्ती आहे. श्री.सिद्धनाथ-जोगेश्वरी यांच्या विवाहा दरम्यान जोगेश्वरी मातेचे पिता शेषराज वासुकी यांनी हा हत्ती भेट (आंदण) दिलेला आहे, अशी दृढ श्रद्धा आहे.
मंडपाबाहेर अनेक दीपमाळा आहेत. सुमारे ४0 ते ५0 फूट उंचीच्या दीपमाळांना तेलाचा वापर करून प्रज्वलित केले जाते.
बाहेर मोठे दगडी प्रवेशद्वार (सज्जा) आहे. पूर्वे, दक्षिण आणि उत्तरेला प्रत्येकी दोन, तसेच पश्चिमेला एक असे एकूण ७ प्रवेशद्वार (सज्जे) आहेत.
म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखोभाविकांचे कुलदैवत म्हणून वंशपरंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री. सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
श्री. सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, सिद्वोबा, काळभैरव, महाकाल आदी नावानेही संबोधले जाते.
या मंदिरात पूजा करण्याचा अधिकार वंशपरंपरागत गुरव समाजाकडे चालत आलेला आहे.
श्री. सिद्धनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण हेमाडपंथी असून चारही बाजूंनी मोठे दरवाजे आहेत. पश्चिमेला माणगंगेचे खोरे आहे. म्हसवडच्या पश्चिमेला सीतामाईच्या डोंगरात माणगंगा नदीचा उगम होतो. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण वनवासात असताना सीतामाता बेशुद्ध पडल्या. तेव्हा लक्ष्मणाने पाण्याचे दोन द्रोण भरून सीतामातेजवळ ठेवले. एक द्रोण मानेजवळ ठेवला तर दुसरा पायाजवळ ठेवला. सीतामाता शुध्दीवर आल्यानंतर दोन्ही द्रोण कलंडले आणि वाहू लागले. ह्यांच्या पासून दोन नद्या निर्माण झाल्या. त्याच म्हसवडला येणारी माणगंगा आणि फलटणला जाणारी बाणगंगा या नद्या आहेत. आजही सीतामाईच्या डोंगरावर हे दोन्ही कुंड पाहायला मिळतात.
मंदिरा शेजारीच श्री.सिद्धनाथांची गादी (श्री.नाथ मठ) आहे. हा मठ सत्यनाथ-नाथपंथी बाल ब्रम्हचारी साधूंचा आहे. येथे गुरू शिष्य परंपरेची गादी वर्षानुवर्षे चालू आहे. ह्या मठाचे सध्याचे मठाधिपती श्री.रविनाथ महाराज हे गुरू महंत भक्तिनाथजी महाराज यांची पाचवी पिढी आहे. याला 'गोसाव्याचा किंवा कानफाटेचा मठ' असेही म्हणले जाते.
श्री.सिद्धनाथ मंदिरात रोज दोनदा (सकाळी व संध्याकाळी) आरतीच्या वेळी प्रथम नैवद्य दाखवण्याचा मान हा मठाचे बाल ब्रम्हचारी महाराज यांना आहे. रोज दोनदा सोवळ्यात नैवद्य दाखवणे, मठाची देखभाल करणे आणि येणाऱ्या साधूंची काळजी घेणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.
मठाच्या परिसारात श्री. सिद्धनाथांची गादी, धुणी, काळभैरव, शंभू महादेवाची पिंड, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, श्रीकृष्ण, ऊजव्या सोंडेचा गणपती यांच्या मूर्ती व महंत हिरानाथ महाराजांची समाधी आहेत.
या मंदिराची दरवर्षी माणगंगा नदी काठी श्री सिद्धनाथ देवाची भरणारी रथयात्रा हा येथील प्रसिद्ध उत्सव आहे. या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ. या उत्सवात भाविक सिद्धनाथाचा रथ ओढत गावाभोवती नगरप्रदक्षिणा घालतात.
श्रींच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती घेऊन रथामध्ये ठेवण्याचा मान गुरव समाजाला आहे. तर रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. हा रथ ओढण्याचा मान माळी समाजाला, तसेच बारा बलुतेदारांनाही रथ ओढण्याचा मान आहे.या यात्रेचे सर्व नियोजन म्हसवड नगरपरिषद व मंदिर प्रशासन पाहते.
म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. हे गाव सातारा-पंढरपूर मार्गावर आहे. आपण राज्य परिवहन बस किंवा खाजगी वाहनाने येथे पोहोचू शकता.
येथे पोहोचण्याचे विविध मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
१) साताऱ्यापासून ८५ किमी अंतरावर (पूर्वेकडे)
२) पंढरपूरपासून ६० किमी अंतरावर (पश्चिमेला)
३) फलटणपासून ६८ किमी अंतरावर (दक्षिणेस)
४) मायणीपासून ३५ किमी अंतरावर (उत्तरेकडे)
आपण मंदिरात खालील सेवांचा लाभ घेऊ शकता.
अभिषेक
साधा पोषाख
संपूर्ण पोषाख
साधी पूजा
महापूजा
देणगी पावती