पौराणिक इतिहास

श्री.सिद्धनाथ म्हणजेच काळभैरव हे शिव अवतार स्वरूप आणि रक्षणकर्ते मानले जातात. श्री.सिद्धनाथांचे महात्म्य अगाध आहे. ते इथे कथेच्या रूपात मांडले आहे.

श्री.सिद्धनाथ महात्म्य

श्री. सिद्धनाथांची मूळ कथा काशीखंड ग्रंथात आहे. ही कथा महान ग्रंथकार श्रीधरस्वामी यांनी लिहिली आहे. तसेच सिद्धांत-बोध ग्रंथात काळभैरव उत्पतीची कथा सांगितली आहे. खालील कथा मूळ ग्रंथावर आधारित आहे.

Image 01

काळासूर राक्षसाचा उपद्रव

फार फार वर्षांपूर्वी भारतवर्षाच्या उत्तरेकडील प्रदेश देवभूमी म्हणून ओळखली जात असे, तसेच दक्षिणेकडील प्रदेश हा असूरभूमी म्हणून ओळखली जात असे.

दक्षिण प्रदेशातील ऋषीमुनी, साधू-संन्याशांना असूरांचा खूप त्रास होत असे. त्याकाळी या प्रदेशात काळासूर राक्षसाचा प्रभाव होता. त्याला कोणीही मारू शकत नव्हते. कारण त्याला असे वरदान होते की, त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर सांडला तरी तो पुन्हा जिवंत होत असे. अशा काळासूराला मारण्याचे अनेक देवतांनी खूप प्रयत्न केले, पण ते त्याला मारू शकले नाही.

काळासूराच्या सततच्या त्रासाला कंटाळून दक्षिण प्रदेशातील ऋषीमुनी, साधू-संन्याशी सर्वप्रथम भगवान विष्णूंकडे गेले व काळासूराच्या त्रासापासून रक्षण करण्याची विनवणी केली.

'आपल्यावर भूलोकाचे पालन करण्याची जबाबदारी असल्याचे' सांगून भगवान विष्णूंनी काळासूराचा वध करण्यास असमर्थता दर्शविली व त्यांना ब्रह्मदेवाकडे पाठविले. ब्रह्मदेवाकडे 'सृष्टीची निर्मिती करण्याचे कार्य असल्याने' त्यांनीही काळासूराचा संहार करण्यास असमर्थता दर्शविली. ब्रह्मदेवाने सर्वांना भगवान शिवाकडे विनवणी करण्याचे सुचविले. असूरांचा व सृष्टीचा संहार करण्याचे सामर्थ्य फक्त भगवान शिवाकडे आहे.

श्री. सिध्दनाथांची उत्पत्ती

ब्रह्मदेवांच्या सूचनेप्रमाणे सर्व ऋषीमुनी, साधू-संन्याशी भगवान शिवाकडे गेले व काळासूराचा वध करण्यासाठी साकडे घातले. त्यांचे म्हणणे ऐकून शिवांनी काळासूराचा वध करण्याची विनंती मान्य केली. मग शिवाने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटल्या व त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. हा दिव्य पुरुष म्हणजेच शिवाचा प्रत्यक्ष अवतार "श्री.सिद्धनाथ" होय.

शिवाने सिद्धनाथांना आशिर्वाद दिला व सांगितले की काळासूराला मारण्यासाठी श्री.सिद्धनाथांना पाताळलोकातील पाच कुंडातील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त करावी लागेल, तरच ते काळासूराचा वध करू शकतील. हे ऐकून श्री.सिद्धनाथांनी शिवाला पाताळात जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा शिवांनी सांगितले की भूलोकावर घोड्यावरून भ्रमण करत जाताना जिथे घोड्याचे खूर जमिनीत रुततील, तेथूनच पाताळात जाण्याचा मार्ग दिसेल.

शिवाचे हे विधान ऐकून व आशिर्वाद घेऊन श्री.सिद्धनाथ घोड्यावरून भूलोकावर भ्रमण करण्यासाठी निघाले. अनेक दिवस प्रवास केल्यानंतर एके ठिकाणी घोड्याचे खूर रुतले तिथे त्यांना पाताळात जाण्याचा मार्ग सापडला.

पाताळलोकातील नागराज वासुकींबरोबर युद्ध

त्यावेळी पाताळात नागराज वासुकी यांचे राज्य होते. श्री.सिद्धनाथांच्या रूपाने अनाहूत पाहुणा बघून तेथील नागराजाच्या सैनिकांनी श्री.सिद्धनाथांना अडवले. पुढे हा वाद विकोपाला जाऊन श्री.सिद्धनाथ व त्या सैनिकांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात श्री.सिद्धनाथांचा विजय झाला. राजाच्या दूतांनी ही वार्ता नागराज वासुकी यांना कळविली. इतर काहीही चौकशी न करता वासुकी थेट श्री.सिद्धनाथांवर चालून गेले. या घनघोर युद्धात श्री.सिद्धनाथांनी अपार पराक्रम दाखवीत नागराज वासुकींचाही पराभव केला व त्यांना बंदी बनविले.

नागराज वासुकींनी अविचाराने केलेल्या कृत्याची माफी मागितली. श्री.सिद्धनाथांचा असा दिव्य पराक्रम पाहून नागराज वासुकीची मुलगी योगेश्वरी हिने आपल्या पित्याला अभय देण्याची विनंती केली. श्री.सिद्धनाथांनीही त्यांना माफ करून आपल्या पाताळलोकात येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यानंतर नागराजांच्या परवानगीने श्री.सिद्धनाथांनी पाच कुंडातील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली.

श्री.सिद्धनाथांचा माता जोगेश्वरीसह पाताळलोकातून भूलोकात प्रवेश

श्री.सिद्धनाथांच्या पराक्रमाने मोहित झालेल्या नागकन्येने श्री सिद्धनाथांशी विवाह करण्याचा निश्चय केला. ही गोष्ट वासुकींनां समजताच त्यांनीही खुशीने हा प्रस्ताव श्री.सिद्धनाथांपुढे मांडला. श्री सिद्धनाथांनी आपल्या ज्ञानाने योगेश्वरीच्या स्वरूपाचे प्रतिबिंब आपल्या अंतकरणात पाहिले. श्री.सिद्धनाथ हे शिवाचे वास्तविक स्वरूप आहेत, तर माता योगेश्वरी या आदिमाया स्वरूप आहेत. युगानुयुगे त्यांचा ऋणानुबंध आहे. ही गोष्ट श्री सिद्धनाथांच्या स्मरणात आल्यावर त्यांनी या विवाहास संमती दिली.

योगेश्वरी या नावाचा पुढे अपभ्रंश होऊन 'जोगेश्वरी' झाले. नागराज वासुकी यांनी माता जोगेश्वरींना हत्तीवर बसवून श्री.सिद्धनाथांबरोबर भूलोकावर पाठविले.

श्री.सिद्धनाथांकडून काळासूराचा संहार

भूलोकात आल्यावर श्री.सिद्धनाथ दक्षिण प्रदेशात काळासूराचा संहार करण्यासाठी गेले. अनेक वर्षे श्री.सिद्धनाथ व काळासूर यांच्यात घनघोर युद्ध चालू होते. श्री.सिद्धनाथांनी आपल्या दिव्य शक्तीने काळासूराचा अनेकदा शिरच्छेद केला. पण त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की तो पुन्हा जिवंत होत असे. हे युद्ध पाहण्यासाठी स्वर्गात सर्व देवदेवता उपस्थित होत्या. शेवटी श्री.सिद्धनाथांचा भक्त असलेला काळा कुत्रा मदतीला धावून आला. पुन्हा एकदा जेव्हा श्री.सिद्धनाथांनी काळासूराचा शिरच्छेद केला व त्याचे मुंडके हातात धरले, तेव्हा हा काळा कुत्रा त्यांच्या मागे मागे चालत खाली पडणारे रक्ताचे थेंब आ वासून आपल्या मुखात झेलत राहिला. त्यामुळे काळासूराचा मृत्यू निश्चित झाला. काळासूराचा संहार केल्यामुळे त्यांना काळभैरव या नावानेही संबोधले जाते.

या सिद्धनाथाला काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वरही म्हणतात. तसेच या देवाची पूजा करणाऱ्यांचे श्री.सिद्धनाथ रक्षण करतात म्हणून या देवाला कुलस्वामी म्हणतात. कुळाचे रक्षण करणारी देवता म्हणून हा देव प्रसिद्ध आहे.

Image 01
Image 01

श्री.सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह

काळासूराच्या वधाच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व देवदेवता व साधू-संन्याशांनी श्री.सिद्धनाथांचा जयघोष केला. "श्री.सिद्धनाथांच्या नावानं चांगभलं", "श्री.भैरवनाथाच्या नावानं चांगभलं" अशा जयघोषांनी तिन्ही लोक दुमदुमून गेले.. त्याच दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध १२ (द्वादशी) ला सर्व देवीदेवतांनी रात्री १२ वाजता श्री.सिद्धनाथ-जोगेश्वरी यांचा विवाह लावून दिला. हा विवाह सोहळा अतिशय दैवी पद्धतीने संपन्न झाला. अनेक देवगण, योगी, महर्षी या लग्नाला उपस्थित होते. श्री.सिद्धनाथ-जोगेश्वरी विराजमान झालेल्या रथाला सोन्याचे दोर जोडलेले होते. विवाह झाल्यानंतर सोन्याने मढवलेले दोर स्वत: देवांनी ओढले.

तदनंतर श्री.सिद्धनाथ-जोगेश्वरी यांनी श्री.क्षेत्र म्हसवड येथे कायमचा रहिवास केला. त्यामुळेच हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून नावारूपाला आले.

आजही दरवर्षी कार्तिक शुद्ध १२ (द्वादशी) ला श्री.सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हळदी समारंभ कार्तिक शुध्द १ रोजी व विवाह समारंभ कार्तिक शुध्द १२ रोजी असतो. तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री सिद्धनाथ-जोगेश्वरीची भव्य मिरवणूक रथयात्रा निघते. भाविक मोठ्या श्रद्धेने या रथाला जोडलेली दोरी ओढतात. हा रथ नगर प्रदक्षिणा करून मूळ ठिकाणी परत आल्यावर श्रींच्या उत्सवमूर्ती पून्हा मंदिरात विराजमान करतात.